Ad will apear here
Next
अवघे हरिमय योगबळे
सुधीर काळे यांनी लिहिलेल्या ‘अवघे हरिमय योगबळे’ या कादंबरीची द्वितीय आवृत्ती आणि ई-बुकच्या प्रकाशनाचा सोहळा २९ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात होणार आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. अध्यात्माचा आनंदमय प्रवास या कादंबरीत मांडण्यात आला आहे. हिमालयाच्या संगतीने घेतलेल्या स्वतःच्या आणि परमोच्च सुखाच्या शोधाची ही अद्भुत कहाणी आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
.........
पत्नीसाठी साऱ्या व्यवहारांचा खुलासा करणारे पत्र लिहिले होते. माझ्या बाबतीत मी एवढेच लिहिले होते, की प्राप्त परिस्थितीत मला घरात राहणे शक्य नाही. आत्महत्येचे विचार माझ्या मनात येत आहेत; पण असे करणे हे भ्याडपणाचे ठरेल म्हणून मी घर सोडून जात आहे. मी परतेन अथवा नाही हे येणारा काळच ठरवेल, तरी यापुढील निर्णय स्वत:चे स्वत:च घ्यावेत. आत्महत्येला भ्याडपणाचे लक्षण म्हणताना संकटांना घाबरून घर सोडून जाणे, हे तरी दुसरे काय आहे हे मला समजत होते. तरीदेखील तोच मार्ग स्वीकारावयाचा, असे मी माझ्या मनाशी पक्के ठरवले होते.

मनाचा असा निश्चय होताच समुद्रकिनाऱ्यावरून मी उठलो व माझी पावले घराकडे वळली. घरात नेहमीप्रमाणेच वातावरण होते. मुले एकमेकांशी भांडत होती. मला उशीर झाल्यामुळे पत्नीच्या चेहऱ्यावर संताप होता. कोर्टकचेऱ्यांशी संबंधित काही पत्रव्यवहार येऊन पडला होता.

आयुष्यात प्रथमच या साऱ्याकडे निर्विकार मनाने पाहून मी कसेबसे जेवण उरकले. पत्नी स्वयंपाकघरात असतानाच दोन कपडे, एक सतरंजी व एक चादर असे एका छोट्या पिशवीत ठेवून ती घराबाहेर ठेवली. पत्नीच्या पर्समध्ये आवश्यक ती कागदपत्रे, मी लिहिलेले पत्र ठेवले व घराबाहेर पडलो. रात्री जेवणानंतर सहजच एखादी पायी चक्कर मारण्याचा माझा परिपाठ होता. त्यामुळे बाहेर पडताना मला कोणी विचारले नाही. घराबाहेर ठेवलेली पिशवी उचलून मी रस्त्यावर आलो. क्षणभर मन दोलायमान झाले. मी घराकडे पाहिले. क्षणभर पावले परत वळली. एवढ्यात सावरलो. मनाचा हिय्या करून भराभरा पावले टाकीत घरापासून दूर दूर निघालो. कोठे जात होतो हे मात्र माहिती नव्हते.

मुंबई सोडायची हे मी निश्चित ठरवले होते; पण मुंबई सोडल्यावर जायचे कोठे हा निर्णय मात्र पक्का नव्हता. हा निर्णय नियतीवरच सोडावा, असा विचार करून मी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आलो. तेथे चौकशी करता दोन तासांनंतर डेहराडून येथे जाणारी गाडी आहे, असे समजले. काहीही विचार न करता त्या गाडीचे तिकीट काढून मी रेल्वेस्थानकावर बसून राहिलो.

स्टेशन माणसांनी फुलले होते. जाणारी, येणारी, पोहोचवण्यास येणारी अशी सर्व प्रकारची माणसे होती. आपले जीवन तरी यापेक्षा काय वेगळे असते? काही माणसे जगात येतात, काही जगातून जातात. जाणाऱ्यांना पोहोचवावयास काही जण येतात. तेही कधी तरी जाणारच असतात. जीवनाच्या या प्रवासात स्थानक कोणते असेल? आज या स्थानकावरील हा सारा जाण्यायेण्याचा खेळ मी अलिप्तपणे पाहात होतो. जन्म-मृत्यूच्या बाबतीत अन् जीवनप्रवासाच्या बाबतीत असे स्थानक कोणते असेल, जेथे बसून मी तो खेळही तटस्थपणे पाहत राहू शकेन?

माझ्या मनातील या विचारांचे मलाच आश्चर्य वाटले. आज प्रथमच अशा प्रकारचे विचार माझ्या मनात आले होते. तसा धार्मिक अथवा आध्यात्मिक प्रवृत्तीचा मी कधीच नव्हतो. घरच्या देवांची पूजाही मी कधी केली नाही. कधी कोणा साधू, सत्पुरुषाच्या दर्शनासही गेलो नाही. सांसारिक अडचणी अनंत होत्या; पण त्यावर उपाय शोधण्यासाठी हा मार्ग मी कधीच शोधला नव्हता.

वेळ पुढे पुढे जात होता. अचानक मला घरची आठवण आली. मला घर सोडून दोन तास होऊन गेले होते. एवढ्यात कोणाच्या लक्षात आले असेल, तर माझी शोधाशोधही सुरू झाली असेल. क्षणभर मन पुन्हा कच खाऊ लागले. मनातील असले विचार झटकून मी उभा राहिलो. गाडी लागतच होती. मी गाडीमध्ये जाऊन बसलो. मोठा बाक असणारा भाग सोडून एकच सीट असणाऱ्या खिडकीजवळील जागेवर मी बसलो. शक्यतो लोकांशी बोलणे टाळावे हाच त्यामागे हेतू होता. माझ्या जागेसमोर अशीच आणखी एक जागा होती, जेथे केवळ एकच व्यक्ती बसू शकेल. या जागेवर कोण येईल याची मला न कळतच उत्सुकता वाटत होती.

रात्रीचे अकरा वाजत आले होते. गाडी भरत चालली होती. मी बसलो होतो तो डबाही भरत आला होता. उजव्या बाजूस असणाऱ्या मोठ्या बाकांवर समोरासमोर दोन कुटुंबे येऊन बसली होती. दोन्ही कुटुंबांत पती, पत्नी व दोन मुले अशी चौघे जण होती. ही दोन्ही कुटुंबे परस्परांच्या चांगल्याच ओळखीची व एकत्र पर्यटनास निघाल्याप्रमाणे वाटत होती. भाषेवरून व एकंदर राहणीमानावरून मुंबईत बरीच वर्षे राहिलेली ती गुजराथी मंडळी असावीत, असे वाटत होते. दोन्ही कुटुंबांतील मुले अठरा, वीस वर्षांच्या वयातील होती. कुटुंबप्रमुख हे मध्यमवयीन होते. बहुधा व्यापार-उद्योग करणारी सुखवस्तू अशी ती मंडळी होती.

मी या मंडळींबाबत मनातल्या मनात वेगवेगळे अंदाज बांधत बसलो असतानाच माझ्या समोरच्या जागेवर एक वृद्ध वाटावेत असे गृहस्थ येऊन बसले. त्यांचे वय साधारणत: साठीच्या पुढे असावे. अंगावर पातळसर कुडता व पायजमा असा त्यांचा वेश होता. जवळ खांद्यावर नेण्याजोगती एक पिशवी व पाण्याची बाटली, या व्यतिरिक्त काहीही सामान नव्हते. रंगाने गोरीपान व चेहरा अत्यंत तेजस्वी असणारी ती व्यक्ती पाहाताक्षणीच लक्ष वेधून घेईल अशीच होती. त्यांच्याकडे एकदा पाहिल्यावर पुन:पुन्हा पाहात राहावे, असे काही तरी अनामिक आकर्षण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. गाडीत येताना ते एकटेच येऊन बसले होते. त्यांच्या बरोबर अथवा पोहोचवण्यास कोणी आले आहे, असे दिसत नव्हते. रेल्वेचा प्रवास जणू अंगवळणी पडलेला असावा एवढ्या सहजतेने ते आपल्या जागेवर येऊन बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण अनिर्वचनीय अशी शांतता व मार्दव प्रकटलेले होते. सभोवताली इतका गोंधळ चालू असतानादेखील ते जणू गिरीकुहरात बसल्याप्रमाणे शांत बसले होते. आपले मोजकेच असणारे सामान बाकाखाली ठेवून, दोन्ही हातांची घडी घालून, मान किंचित कलती करून ते शांतपणे बसले होते. त्यांच्याकडे असे पाहत राहणे हे असभ्यपणाचे ठरेल. कदाचित त्यांना आवडणारही नाही, हे मला समजत होते; परंतु कितीही प्रयत्न केला तरी नजर वारंवार त्यांच्याकडे वळत होती.


(‘अवघे हरिमय योगबळे’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZCCCH
Similar Posts
सुधीर काळे यांच्या ‘अवघे हरिमय योगबळे’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २९ डिसेंबरला पुणे : सुधीर काळे यांनी लिहिलेल्या ‘अवघे हरिमय योगबळे’ या कादंबरीची द्वितीय आवृत्ती आणि ई-बुकच्या प्रकाशनाचा सोहळा २९ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात होणार आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
इतिहास-पुराणातील दत्तात्रेय ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’ हा लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सिद्ध झालेला ग्रंथ. श्री दत्त या अत्यंत लोकप्रिय आणि अद्भुत दैवताचे संशोधनात्मक दर्शन त्यांनी या पुस्तकातून घडविले आहे. या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
प्रकाशपुत्र रघू... रघुनाथ... सद्गुरू श्री शंकर महाराजांनी निवडलेला, अध्यात्मात खूप उंची गाठण्याची क्षमता असलेला एक साधक, खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा. महाराजांनी त्याला सोपवलं आपलाच शिष्य जगन्नाथ याच्याकडे. रघुनाथ आणि जगन्नाथ यांच्या आध्यात्मिक प्रवासाची आणि अनोख्या नात्याची कहाणी जगन्नाथ कुंटे यांनी ‘प्रकाशपुत्र’ या पुस्तकातून मांडली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language